नागपूर ची जवळीक, हिंदी भाषेशी अन् नागपूरी हिंदी !
परवाची गोष्ट. कॅलेंडरवर ह्या सप्टेंबर महिन्याचे पान पहात असतांना,माझी नजर १४ तारखे वर थबकली आणि आठवले की १४ सप्टेंबर हा,तमाम केंद्र शासन कार्यालय आणि बॅंका यात राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मग हे पण कुठं तरी वाचल्याचे आठवले की १४ सप्टेंबर १९४९ रोजी झालेल्या संविधान सभा बैठकीत , हिंदी ला ,राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता आणि हिंदी चार प्रचार -प्रसार वाढावा यासाठी १९५३ पासून १४ सप्टेंबर हा राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. आता हिंदी ही राष्ट्रभाषा यावर मतभेद आणि विवाद संभवतो पण ती ,साऱ्या देशाला जोडणारी ,प्रभावी संपर्क भाषा आहे,ये तो मानना ही पडेगा ! असो! आपला आजचा विषय हा अलग असून तो , शीर्षकात आला आहेच !
नागपूर ची म्हणजेच इथल्या बहुसंख्य व्यक्तींची हिंदी शी सलगी याला कारण आहे. नागपूर ही , तत्कालीन सीटी
एंड बेरार या प्रांताची राजधानी होती आणि १९५६ च्या राज्य फेर आकारणी नंतर सीपी ( Central Provinces) चे छिंदवाडा , बैतूल, बालाघाट हे जिल्हे , मध्यप्रदेशात गेले आणि बेरार (व-हाड) - नागपूर वर्धा, चंद्रपूर इ महाराष्ट्र राज्यात सामावले. असं म्हणतात की नागपूरात , दोन मराठी माणसं घराबाहेर,हिंदीतूनच बोलतात ! और वैसे भी, अस्सल नागपूरी तुमच्याशी मराठीत बोलता बोलता ,कधी २ वाक्यं हिंदी तून फेकेल,काही नेम नाही ! इथं , घराबाहेर पडलं की आपला सामना, हिंदी शी होतो कारण , ऑटो चालक,फळं व भाजी विकणारे ,इतर दुकानदार यांच्याशी हिंदी तच संवाद साधला जातो. हीच तर या नागपूर ची खासियत आहे जी त्याला ,पुणे/ नाशिक/ कोल्हापूर पासून वेगळी पहचान देतं ! महत्वाचं असं की इथं , सामान्य पणे जी हिंदी आपल्या कानावर पडते,ती काही वाराणसी/ प्रयाग राज वाली हिंदी नाही तर ती आहे नागपूरी हिंदी,यावर मराठीचा प्रभाव साफ दिसून येतो. मराठीचे असं का/ हो का यात ऐसा क्या/ हाव क्या होतात ! मराठीत वापरला जाणारा "च'( जावंच/ करावंच) , यात जानाइच / करनाइच बनून जातात! बावा
( बाबा नाही) या शब्दाचा मजेशीर प्रयोग या नागपूरी हिंदीत सतत होत असतो पण
हिदीतल्या आदरार्थी आप ला यात स्थान नाही,सारं काम तुम नेच भागतं ! आता काही
नमूना वाक्यं पेश करून हे लांबण आवरतं घेतो:
-- भेंडे लेआऊट जाने का
तुम क्या दोंगे ?
--तुम तो मानतेइच नई बावा!
--तुम तो आजकाल घरमेइच
बैठे रैते, बाहर निकलोंगे तो
मालूम पडेंगा !