पतंग मांजा आणि हरवलेली बालपणाची कला

पतंग मांजा आणि हरवलेली बालपणाची कला

पतंग, मांजा आणि हरवलेली बालपणाची कला

पतंग आणि मांजा शिवाय संक्रांतीचा सण असूच शकत नाही. संक्रांत जरी जानेवारीत येत असली, तरी आमच्या लहानपणी आकाश नोव्हेंबरपासूनच रंगीबेरंगी पतंगांनी फुलून जायचे. आज मात्र चित्र बदलले आहे. पतंग संक्रांतीच्या एखाद-दोन दिवस आधीच दिसू लागतात आणि संक्रांतीनंतर दोन-तीन दिवसांतच आकाश पुन्हा रिकामे होते.

तीन दशके अगोदर पतंग पकडणे ही एक स्वतंत्र ‘कला’ होती, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. तेव्हा नागपूर शहर आजच्यासारखे काँक्रीटच्या जंगलाने भरलेले नव्हते. उंचच उंच इमारती नव्हत्या, मोबाईल कंपन्यांचे टॉवर नव्हते, विद्युत तारांचे गुंतागुंतीचे जाळे नव्हते आणि मोकळी मैदाने, खुल्या जागा भरपूर होत्या. त्यामुळे पतंग उडवण्याइतकीच मजा कटलेली पतंग पकडण्यातही होती.

कटून आलेली पतंग पकडणे मात्र धाडसाचे, कधी कधी जीवावर बेतणारे काम असायचे. त्यासाठी खास प्रकारच्या काड्या तयार केल्या जायच्या. त्यांना ‘काट्या’ म्हणत. काड्यांच्या टोकाला झाडांच्या निष्पर्ण, पूर्णपणे वाळलेल्या काटेदार फांद्या घट्ट बांधल्या जायच्या, जेणेकरून पतंग किंवा मांजा त्यात सहज अडकावा.

अशा ‘काट्या’ हातात घेऊन मुले कटलेली पतंग ताब्यात घेण्यासाठी अक्षरशः धावत सुटायची. आकाशात फिरणाऱ्या पतंगावरची नजर क्षणभरही हटू द्यायची नाही, हातात काट्या घट्ट पकडायच्या, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांपासून स्वतःचा बचाव करायचा आणि तरीही ‘टार्गेट’ साधायचे—हे सगळे एकाच वेळी करणे मोठे जिकिरीचे काम होते. न फाटता पतंग हातात येणे म्हणजे जणू नशीबच.

या प्रकाराला ‘पतंग लूटणे’ असे म्हटले जायचे. कधी एखाद्याने पकडलेली पतंग दुसऱ्याला खुपायची. इर्षेपोटी काही मुले ती पतंग बळकावून फाडून टाकायची आणि मग भांडणांना तोंड फुटायचे. कधी-कधी ही भांडणे इतकी विकोपाला जायची की अनर्थ घडायचा.

पतंग लुटताना मुले पडायची, हातापायाला दुखापत व्हायची, अंगावर जखमा व्हायच्या—पण तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच उत्साह, तीच धावपळ. आज मोबाईल आणि टीव्हीमध्ये रमलेल्या मुलांना जेव्हा आम्ही हे सगळे सांगतो, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य दाटून येते. त्यांना हे सगळे ऐकून अविश्वसनीय वाटते.

काळ बदलला आहे. आकाश मोकळे राहिलेले नाही आणि बालपणही कदाचित तसे उरलेले नाही. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात आजही ती कटलेली पतंग फिरत असते—आणि तिच्यामागे धावणारे ते निष्पाप, बेधडक बालपणही.

Share blog on whatsapp

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *