साठ-सत्तरच्या दशकात नागपुरात फ्लॅट-स्कीम्स नव्हत्या. अंगण असलेल्या स्वतंत्र घरात लोक राहात, ज्याला पुण्याचे लोक 'बैठे घर' व मुंबईचा पाहुणा 'बंगला' म्हणत असे. थंडीची तीव्रता सांगायला टीव्ही अस्तित्वात नव्हता. रोजचं टेम्परेचर पेपरमध्ये वाचायची प्रथा नव्हती.
*दिवाळीत नरक-चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानाने हिवाळ्याची*
*चाहूल लागे*.
सकाळच्या शाळेत जातांना हाफ-पॅण्ट घातलेले कुडकुडणारे पाय थंडीची तीव्रता सांगत. थंडीत प्रार्थना म्हणतांना तोंडातून वाफा निघत. मग पी टी चे सर हाताचे तळवे एकमेकांवर घासायला सांगत. शाळेची इमारत गारठलेली असे. अशा वेळेस मॅडम पटांगणातल्या कोवळ्या उन्हात क्लास घेत असत. गवतावरच्या दवाने पॅण्ट ओली होत असे.
घरच्या अंगणात उन्हात कायम एक खुर्ची ठेवलेली असे. सकाळी ती बाबांना पेपर वाचायच्या कामी यायची. दुपारी मी शाळेतून घरी येई तेव्हां याच खुर्चीवर आईच्या लांबलचक केसांच्या वेणीचं शेवटचं इंस्टॉलमेंट पुरं होत आलेलं असे. एरवी घरातले एखादे ब्लँकेट किंवा स्वेटर, उन दाखवायला त्यावर पहुडले असे. हल्ली दिवस लहान होऊन लवकर अंधार पडू लागे.
गारठलेल्या सिमेंटच्या घरात रात्री होम-वर्क करणे जीवावर येई. मग आई कोळशाच्या शेगडीत निखारे शिलगाऊन ती हॉलमध्ये ठेवत असे. जगाच्या पाठीवर कुठेतरी कोल्ड-वेव्ह आल्याची न्यूज या शेगडीच्या उबेत आम्ही रेडिओवर ऐकायचो. थंडीने ताईचे ओठ उलायचे, पायाच्या टाचांना भेगा पडत. किराण्याच्या दुकानातून आणलेले आमसुलाचे तेल आई पितळेच्या कटोरित शेगडीवर गरम करायची, आणि ताईच्या ओठांना, तळपायाला लावून द्यायची. व्हॅसलीन, कोल्ड-क्रिम हा प्रकार नव्हता. आम्हाला शेगडीची ऊब देऊन स्वतः मात्र आई थंडीतच किचन आवरू लागायची. थंड पाण्याने स्टोव्ह आणि बैठा ओटा धुवायची. पहाटेच्या दुधवाल्याकरता खिडकीच्या पाळीवर दुधाची रिकामी बाटली ठेवायची. रात्री पावणे-अकराच्या एम्प्रेस मिलच्या भोंग्यापर्यंत तिचे कामं पुरत. जेव्हां की शेगडीखाली निखाऱ्याची राख जमा झालेली असे, तेव्हां कुठे ती मोकळी होई.
थंडीमुळे शहर रात्री नऊ नंतर सामसूम होई. इतकं, की
निजानीज झाल्यावर नीरव शांततेत महाराजबागेतल्या
वाघाच्या डरकाळ्या घरी ऐकू येत.
*सकाळी अंथरुणातून बाहेर निघावेसे वाटत नसे.*.
कुडकुडत्या थंडीत अंगणातला पेपर उचलून आणणे जीवावर येई. अंगणातल्या गवती-चहाची पत्ती टाकून आई सकाळचा चहा बनवत असे. घरभर त्याचा सुगंध दरवळायचा. दुधाच्या बाटलीच्या झाकणावर गोठून जमा झालेली साय चाटण्याची गोडी काय वर्णावी! मागच्या अंगणात भुस्याच्या शेगडीवर आई आंघोळीच्या पाण्याचा गुंड ठेवायची. काजळी धरून तो इतका काळा झालेला असे की तो पितळेचा की तांब्याचा हे ही ओळखू येत नसे. गरम पाण्याचा गुंड बादलीमध्ये रिकामा करण्यासाठी मनगटात जोर असावा लागे. रविवारी मात्र आंघोळीची घाई नसे. नाजूक गुलाबावरचे मोहक दवबिंदू न्याहाळत, हातात खराटा घेऊन मी आधी संपूर्ण अंगण झाडत असे. घरोघरी पेरू, सीताफळ, आंबा, पपई, लिंबू इत्यादी फळझाडे व गुलाबापासून झेंडूपर्यंत सर्व फुलझाडे असत. त्यामुळे वाळकी पाने, काटक्या, फांद्या असा बराच पाला-पाचोळा निघे. तो जाळून मागच्या अंगणात विटेच्या चुलीवर आम्ही पाणी तापवायचो. चुलीची ऊब बरी वाटायची. आंघोळ करतांना पाण्याला धुरकट वास येत असे. आजही गिझरच्या युगात दूरवरून पाल्यापाचोळ्याचा जळकट वास नाकात शिरला तर बालपणीच्या घराचे चित्र डोळ्यापुढे उभे राहून आई-बाबांच्या आठवणीने गहिवरून येते.
रविवारी कानावर रेडिओ सिलोनची गाणी आणि अंगावर कोवळे उन, अशा थाटात मग अंगणात पेपर चाळायचा! शेजारचे भागवतकाका दाढी करताकरता विचारत, "काय रे, आटोपलं का तुझ्या शाळेचं गॅदरिंग? रनिंगमध्ये कितवा आलास तू?" लांबूनच येणाऱ्या शिकेकाईच्या वासाने शेजारच्या अलका वहिनींची चाहूल लागत असे. उन्हात मान वाकवून चेहऱ्यावरून सोडलेल्या केसांच्या आडून त्या आवाज देत, "सर्दी गेली का रे तुझी? रात्री निलगिरीच्या तेलाचा वास घे". घाटेकाकू उन्हातल्या दोरीवर कपडे वाळत टाकता टाकता मला पूजेसाठी जास्वंदाची फुले मागत.
सूर्य अस्ताला गेला की सातनंतर थंडीमुळे नागपुरात सिटी-बसेस रिकाम्या धावत. शेजारचे पाठक मास्तर अंगणात शेकोटी पेटवत. चार घरची तरणीताठी पोरं त्यावर हात शेकण्यास येत. जयस्वालकाका त्यात आपली सिगरेट शिलगाऊन घेत. कुणीतरी शेतावरच्या, गावाकडच्या भुताखेतांच्या गोष्टी सांगत. एरवी आकाशात बागडणारी पाखरं आताशी वृक्षाच्या उबेत चिडीचूप होऊन जात. एखादं मांजरीचं पिलू आमच्या घरी जिन्याखाली पोत्यामध्ये स्वतःला गुरफटून घेई.
*मग एक दिवस शाळेतून घरी येतांना तीळगुळाचा सुगंध*
*येई. संक्रांतीचे वेध लागत. आई म्हणायची आता थंडी कमी*
*होईल*.
चांदण्याच्या/ खडीच्या काळ्या साड्या नेसून, नटून थटून गृहिणी एकमेकांकडे हळदी-कुंकवाला जातांना दिसत. दुपारच्या उन्हात गच्चीवर पतंग उडवण्याची मजा याच दिवसांत! कुणाच्याही गच्चीवर चार घरची पोरं पतंगीचा धुमाकूळ घालतांना दिसत. एखाद्या रविवारी कुणाच्या टेरेसवर मांजा घोटण्याचा कार्यक्रम असे. पतंग फाटली तर ती चिकटवण्यासाठी लाईनीतल्या कुणाच्याही आईला (त्या रेशनिंगच्या काळातही) भात मागण्याची मुभा होती.
हळूहळू थंडी कमी होऊ लागे. पाठक मास्तर म्हणत, होळी ही जणू शेवटची शेकोटीच! म्हणून ती साजरी करायची. "होळी जळाली थंडी पळाली" असे आजी म्हणत असे. घरातले स्वेटर्स/ ब्लॅंकेट्स लोखंडी कपाटात कोंबण्याआधी त्यांना शेवटचे ऊन दाखवण्यात येत असे. आताशी पतंगीची चक्री कुणीतरी आटाळ्यावर टाकलेली असे.
मौसम बदलू लागे तशी संध्याकाळची वाऱ्याची झुळूक हवीहवीशी वाटे. झुडुपातली पाखरं उगाचच या टोकावरून त्या टोकाकडे झेप घेऊन बागडू लागत. दिवस मोठा होऊ लागे. गोठ्याकडे परतणाऱ्या गाई-गुरांना आता घाई नसे. गळ्यातली मंजूळ घंटा वाजवत कुणी पोळी,भाकरी देईल म्हणून ती एखाद्याच्या फाटकाशी रेंगाळतांना दिसत.
*एव्हाना येणाऱ्या गर्मीची चाहूल मांजरीच्या पिलालाही*
*लागलेली असे. जिन्याखालचे बस्तान गुंडाळून ते आताशी*
*गच्चीवर पाण्याच्या टाकीखालच्या गारव्यात शिफ्ट झालेले*
*असे*.