नुकतीच ,इथं एक पोस्ट वाचनात आली ,ज्यात ७० आणि ८० च्या दशकातली नागपूरची मंगल कार्यालय
(हो , तेव्हा मॅरेज हाॅल आणि हाॅटेल हा
प्रकार नव्हता !) यांत होणारी लग्नं कशी पार पडायची ,यांचे सजीव चित्रण
होते ! ते वाचून मन भूतकाळात शिरले
कारण ७० च्या दशकात ,अहिल्या
मंदिर ,मिलन मंडप ,जोशी मंगल, अमर
ज्योती किंवा चिटणीस वाडा अश्या ठिकाणी मी काही विवाहांना हजेरी
लावली होती ! या काही आठवणी !
तसं बघायला गेलं तर ,त्या काळी लग्नं बहुदा उन्हाळ्यात व्हायची आणि
त्यांची तयारी , किमान महिनाभर आधी सुरू होऊन जायची. सुरूवात
विविध खरेदी पासून - कपडा, दागदागिने ,ते किराणा आणि इथं ही
सारी कामं ,अनुभवी मंडळींच्या हातात
असायची ! कार्यालय ,आचारी ,बॅंड इ
ठरविणे पण तिकडेच !
कार्यालतातील लग्न ,हा साधारण पुणे
दीड दिवसाचा मामला असायचा. आदल्या दिवशी ,दुपार पर्यंत वधू पक्ष
दाखल व्हायचा. पहिले महत्त्वाचे काम
म्हणजे ताटं,वाट्या इ चा " चार्ज ' घेणे,
चे एखाद्या अनुभवी व्यक्ती चे काम असे ! संध्याकाळ पर्यंत ,वर पक्षांकडील निवडक मंडळी पण येत
आणि सीमंतपूजन पार पडत असे. त्या
रात्री , जेवण बहुदा साधंच - ढेणसाची
भाजी , फोडणीचे वरण इ ,पण बेत रूचकर रहात असे. नंतर वर पक्ष आराम करायला मोकळा तर वधू पक्ष
लाडू बांधायला घेत असे आणि यात
पुरूष पण सहभागी होत.
लग्नाच्या दिवशी ,लग्न अगदीच सकाळी असेल तर आंघोळी इ ची गडबड पार पहाटे पासून सुरू ! वर- वधू वर अक्षता पडल्या की वर पक्षाकडे
चिवडा- लाडू यांची फराळाची ताटे
पोहचवली जायची ! नंतर जेवणाच्या
पंगतीत , नवरी मुलगी आपल्या वडील
इ सोबत बुंदी लाडू/ जिलेबी चा आग्रह
करायला यायची !
संध्याकाळी वर पक्ष वरात किंवा अन्य
प्रकारे येथून रवाना व्हायचा आणि नंतर वधु पक्ष आवरसावर करायला घ्यायचा शिवाय " चार्ज ' देणे पण पार
पाडून , मंडळी घरी परतायची.
यात ,गमतीचे बरेच प्रकार. व्हायचे.
वधु पक्ष आमंत्रित मंडळी यांच्या पंगतीत सुरूच असतात आणि वर पक्ष
चहाची मागणी करायचा ! मुलांचे मित्र
आणि मुलीच्या मैत्रिणी यात कुणाच्या
तरी " आंखें चार ' व्हायच्या आणि
यथावकाश ते पण बोहल्यावर चढायचे!
जरा मागे , म्हणजे ६० च्या दशकात
डोकावते तर ,मामला अजून वेगळा !
तेव्हा लग्न हे ,घरीच , समोर मांडव
टाकून ! यात मावशी ,आत्या अश्या
महिला ,रूखवत इ कामांकरिता, अगदी महिनाभर आधी येऊन रहायच्या !
ही मजा , आणि. अश्या गमतीजमती
आता ओसरल्या ,उरल्या त्या फक्त आठवणी !