नागपूर चा उन्हाळा हा नागपूरकरांना त्रासदायक वाटत नाही. सवयच झाली असते. पण इतर गावातील लोक मात्र नक्कीच घाबरतात. उन्हाळा म्हणजे सुट्टी.मस्त मित्र जमवून खेळणे.सायकल चालवणे शिकणे व फक्त आणि फक्त खाणे. या उन्हाळ्यावर भरपूर लेख या ग्रुप वर वाचण्यात आलेत. पण तरीही उन्हाळा आवडतो.
याच उन्हाळ्यातील खरी मजा म्हणजे लग्न. उन्हाळ्यात भरपूर लग्न होतात. लग्नातील मजा तर आजही आठवतात.
लग्न ठरल्यावर मंगलकार्यालय शोधणे म्हणजे एक मोठे काम असायचे. काही वेळा वाड्यात किंवा शाळेत लग्न होत होती. पत्रिका छापणे हे आलेच. महाल भागात नरसिंग टॉकिज समोर अशी दुकाने होती. गुरुजी पण महालातीलच असायचे.
फराळाचे पदार्थ घरीच सर्व शेजारी मिळून तयार करायचे. सिमंती पूजन व लग्नाचा स्वयंपाक तयार करण्यासाठी तेलंगी अय्या होतेच.
भर उन्हाळ्यात हे अय्या जे उघडेबंब व बहुधा फिक्कट लाल रंगाचे धोतर घातलेली त्याही उकाड्यात व चुलिसमोरील विस्तावा समोर संपूर्ण स्वयंपाक लिलया करायचे. सामानाच्या ने आण करायला सदाशिव रिक्षेवाला तीन दिवस बुक असायचा.
सर्व तरुण मंडळींना कामाचे वाटप करायचे म्हणजे सोपे काम नसायचे.लग्नात एक नारायण असायचाच. तो स्वतःला सुत्रधार समजायचा. कामाचे वाटप झाल्यावर सर्व मंडळी जोमात असायची. बँड वाला शोधणे हे आलेच.त्याकाळी चाळीसगाव चा बँड खूपच लोकप्रिय होता.सिमंती पूजनात सर्वांची ओळख करून देण्यात येते.लग्नातील जेवणापेक्षाही चविष्ट जेवण सिमंती पूजनाचे असते.
लग्नाचा मुहूर्त भर उन्हाचा का असतो संध्याकाळचा का नसतो हा एक संशोधनाचा विषय आहे. लग्नात सुट घातलेला घामाघूम झालेला नवरा व मुंडावळया तून उतरणारा घाम ही कल्पनाच करवत नाही.व्यावसायिक फोटो ग्राफर न्हवतेच .ज्याच्या हाती कॅमेरा तो फोटोग्राफर. त्यामुळे विनोदी फोटो असायचे.
अक्षता मुद्दाम फेकून मारणे हा एक खेळ होता. चुकून आजूबाजूला जर एखादा टक्कल पडलेला म्हातारा असेल तर मग काय. येवढ्या अक्षतांचा मारा होऊनही ती व्यक्ती मागे वळून पाहत न्हवती कारण बहुधा हा राष्ट्रीय खेळ त्यांनी पण लहानपणी खेळला असेलच. लग्न लागल्यावर बँड वाजवणे असायचेच.
लग्नात पेढे वाटणे व गुलाबपाणी असायचेच. पुन्हा पुन्हा पेढे खाण्यात खरी मजा होती. येडा बनून पेढा खाणे हा वाक्प्रचार लग्नात अनुभवयास येतो.
मांडवात गाद्या व लोड असायचेच. अजून एक प्रकार म्हणजे फराळाचे ताट. ते यायचेच.मग काय सुतो. वयस्कर व गादी हे समीकरण असायचेच.पोट्टे खेळण्यात मग्न रहायचे.एकाएकी लोड एकमेकावर फेकणे हा आवडता खेळ सुरू व्हायचा व कितिदातरी लोड झोपलेल्या वयस्कर माणसावर पडायचा व महाभारत सुरू व्हायचे.
स्वयंपाक गृहात अय्या पण तापलेला असायचा. एकतर कडक उन्हाळा व समोर चुळीतला विस्तव. यामुळेच सर्व आचारी काळे व एकसारखे दिसत असतील.पण स्वयंपाक मात्र अत्यंत भारी बनवायचे.
पंगत असायची. जागा साफ करून शाळेतल्या पट्टया आंथरणे हा एक मोठ्ठा कार्यक्रम असायचा
पत्रावळीवर जेवण असायचे. महत्वाचे म्हणजे पंगतीत जागा पकडणे व आपल्या भावांडांसाठी व मित्रांसाठी जागा पकडणे. आपली पलटण कुठे बसली आहे ते आपली आई,मावशी,आत्या शेजारी व काकु चुपचाप एकमेकींना सांगायचे.त्यामुळे आलटून पालटून त्याच पोटभर वाढायला यायच्या. पापड व कुरडया वाढल्यावर पटकन पोटात जायच्या.
जिलबी असेल तर शर्यत लागायची,कोण जास्त खातो याची. या सर्व बाबींवर घरच्यांचे बारीक लक्ष असायचे. जिलबी व थंड ताकासारखे कॉम्बिनेशन जगात दुसरे नाही. एकमेकाच्या पानात त्याच्या नकळत पदार्थ टाकणे हे असायचेच.
एका पाण्याच्या ड्रम मधे बर्फाची लादी टाकून थंड पिण्याच्या पाण्याची सोय असायचीच.
यानंतर असायची रुसने व फुगण्याची विहिनीची पंगत. यावर जास्त लिहिणे शक्य नाही.यावर लेखन म्हणजे एक ग्रंथच लिहावा लागेल.
या सर्व मंगल सोहळ्यात एखाद पोट्ट हमखास हरवतच. मग शोधाशोध व त्याच्या आईचा कॉमन डायलॉग याला उगीचच आणल. मग पळापळ सुरू व्हायची. पोट्ट मांडवा बाहेर एकदाच सापडायचे.तसेच बाहेरगावचा पाव्हणं हमखास सनस्ट्रोक ने आजारी पडायचे ,त्याला मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिट करावे लागायचे.
सर्वत्र नुसती धावपळ असायची.
वरात यावर एक लेख नक्की होऊ शकतो.कधीतरी नक्कीच लिहिल.
असे बरेच अनुभव आपल्याला सुध्दा आले असतीलच. मी जसे आठवले तसे लिहिले.
बरोबर लिहिले का.
गेले ते दिन गेले येवढे खरे आहे. संवाद,ओळख व आपुलकीची भावना दिसत नाही हे विदारक सत्य आहे.