दळण आणले नाही असा मध्यमवर्गीय मधला एक ही मुलगा, किंवा पुरुष नसेल. नेमका तुमचा क्रिकेटचा गेम रंगात आला असेल आणि आता 2 तास फिल्डींग केल्यावर आता तुमची बॅटिंग असेल त्याच वेळेस तुमची आई तुम्हाला घरी ताबडतोब बोलावेल आणि जा पहिले दळण घेऊन ये असे सांगते, तेव्हा काय वाटते ??? नेमके माझी बॅटिंग आल्यावरच आईला कसे दळण सुचते??? दिवस भर घरी होतो तेव्हा का आठवत नाही??उद्या बुधवार आहे म्हणजे चक्की बंद तेव्हाच संध्याकाळी दळणा ची का आठवण येते?? असे असंख्य प्रश्न आम्हाला लहानपणी पडत असे. मग रागात, चिडत, पाय आपटत तो अल्युमिनियम चा 8 पायलीचा डबा घेऊन निघा चक्कीवर. एक तर बॅटिंग हुकल्या चा राग आणि जड डबा. कसे तरी सायकल च्या करियर वर तो डबा घेऊन जा चक्की वर.
आमच्या लहानपणी दीनदयाळ नगर मध्ये चक्की नव्हती त्यामुळे गोपाल नगर दुसऱ्या स्टॉप वरून दळण आणावे लागायचे. दळण दळणारा माणूस कधीच ओळखू येत नसे. एकतर तोंडाला फडके आणि पिठात पूर्ण डुबलेला. चक्की वर एक म्हातारी बाई बसली राहायची, सांडलेले दळण ती, तिच्या प्लॅस्टिक च्या पिशवी मध्ये गोळा करायची. आपले दळण झाल्यावर त्यातून थोडे पीठ तिला दिले की, ती सुखी राहाय म्हणून आशीर्वाद द्यायची. दळणाचा डबा सट्ट गरम राहायचं. मग खिशयात असेल तर रुमाल नाही तर सायकल पुसायचे फडके डबा उचलायला कमी यायचा. कुणाची तरी मदत लागायची डबा सायकल च्या मागच्या क्यारियर वर लावण्यासाठी. लहानपणी एकदा गोपाल नगर वरून दळणाचा डबा सायकल वरून घेऊन येताना एक छोटा पोट्ट धावत आडवा गेला आणि सायकल ते पोट्ट आणि दळण सगळ सांडले. त्या पोट्टयाची माय भांडायला आली . त्याला लागले म्हणून.. एक तर मी रडवेला दळण सांडले आता घरी मार पडणार म्हणून. कसे तरी धिंगाणा संपला पण घरी लवकर जायची हिम्मत होत नव्हती. दोन तास टाइम पास करून घरी पोहचलो आणि मग .. .. रिकामा डबा आणि बम शिव्या खाल्ल्या..
दळणाच्या डब्बा ची पण एक गंमत असते. सगळे एअलुमिनी चे डब्बे सारखे दिसतात. त्यात आपला डब्बा ओळखणे म्हणजे दिव्य.. त्यावर लिहिलेले नावे पण इतके दिव्य अक्षरात असतात की वाचणे मुश्किल. आपला डब्बा ओळखायला कधी लाल ठिपका लावला तर दोन चार डब्बा वर same ठिपके. आता आली पंचाईत.. मागे अनेक वर्षे कानिटकर नाव असलेला दळणाचा डब्बा आमच्या कडे होता. डब्बा बदलला की परत तो डब्बा घेऊन चक्की वर जा आणि आपला डब्बा घेऊन या.. त्यामुळे दळण आणणे हे अतिशय बोर काम असे.. कधी कधी हातोहात दळण घेऊन यावे लागे मग. पांच सात दळणा नंतर आपला नंबर असला की अजूनच दिमाख खराब. त्यात ही काही जणांचे 20 पायली दळण.. त्यात तो मध्येच mechanism चेंज करणार . मध्येच हात लावून दळण बारीक आहे का पाहणार. तो चक्की चा चालू होण्याचा वेगळाच आवाज. मग मशीन सुरू होत नाही म्हणून पट्ट्याला धरून चाक फिरविणे. गहू झाल्यावर चण्याची डाळ, कुणाला जाड कणिक हवी तर कुणाला बारीक. आणि दिवाळी चे दिवस असेल तर विचारुच नका. एकेका जणाचे चार चार दळण. मग तिथे खूप दिवस न भेटलेला एखादा मित्र भेटणे आणि मग टपरीवर चहा पिऊन यावे तर त्याचे दळण झालेले, तो भुरर आणि आपण परत निरीक्षण करत बसा. दळणा चे दर देखील नेहमी odd फिगर मध्ये असतात. 4 रु पायली / किलो, सध्या 8 रू किलो असे आहेत वाटतात. मग चिल्लर चा वांधा .. आता बर आहे ऑनलाइन पैसे देता येतात. कधी कुठल्या चक्की मध्ये एखादा मळकट रेडियो लागलेला असतो त्यात सुंदर गाणे आणि सोबत चक्की चा आवाज .. डब्बा गाडीत ठेवताना हमखास पॅन्ट ला कणिक लागणार आणि झटकायला गेले की हमखास अजून पसारणार. दळणाच्या दिवशी नेमकी काळी पॅन्ट असणार. मग परत घरी जाऊन ती पॅन्ट बदलवून पुनः ऑफिस ला जाणे आले.
अजून एक राहिलेच, वार लक्षात न राहिल्या मुळे बुधवारी चक्की वर पोहचू तर संपूर्ण चक्की चे पार्टस वेगवेगळे झालेले दिसतील आणि दगडी गोलावर चक्की वाला छिन्नी हातोड्याने ठक ठक ठोकताना दिसेल.
कुठल्या ही महत्वाच्या कामाच्या वेळेस हे दळण नावाचे प्रकरण उद्भवते. मग मध्येच दळण दळणाऱ्या मालकाशी गप्पा. एक तर त्याला आवजा मुळे एकू येणार नाही . आ आ करून गप्पा. काय म्हणतो तुमचा मुलगा काय करतो आहे ?? तर तो सांगतो सध्या लता मंगेशकर कर मध्ये mbbs ला आहे. थर्ड year ला. मग फी पुष्कळ असेल .. हो आहे पण भरतो आहे education loan न घेता. प्रायवेट कॉलेज मध्ये mbbs ते ही education लोन न घेता ? मग कळते की दिवसभर फडके बांधून राब राब राबणारा बाप आपल्या मुलासाठी काय आणि किती करू शकतो. त्या दिवशी एकदम त्या चक्की वाल्या बाबत आदरयुक्त आपुलकी वाटू लागली . चला चक्की पुराण संपवू या.. माझे दळण झाले, मी चाललो, तुम्ही पहा वाट ..