काही नागपूर आठवणी - भक्ती विषयक !
मंडळी ! आपला गुढीपाडवा हा नुसताच पार पडला आहे आणि आता येत्या १७ एप्रिल ला आहे रामनवमी ! या दिवशी ,श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून
निघणाऱ्या शोभायात्रा विषयी जितके बोलू ते कमीच ठरेल म्हणून बोलणं
टाळतो ! याच अनुषंगाने विचार केला
असता,असे लक्षात आले की भक्ती आणि अध्यात्म या क्षेत्रातली इथली
परंपरा ,ही जुनीच ! यावरच काही
आठवून गेले ,ते असे.
याविषयी ,माझी पहिली आठवण ही
साधारण १९६७-६८ सालची असावी. तेव्हा आम्हीं इंदूरला रहात होतो आणि
इथं ,आजी- आजोबांकडे आलो होतो.
तेव्हा , आजी सोबत गजानन बुवा
मराठे यांच्या कीर्तनाला गेल्याचे
अंधुकसे आठवते ! याच काळात,महालात ,दक्षिणामुर्ती मंदिरात
बाळशास्त्री हरदास यांची विद्वत्तापूर्ण
प्रवचनं होत असत आणि आजोबा
त्यांना जात असत. तसेच इथले
बाबासाहेब साल्पेकर यांचे देवस्थान
पण फार प्रसिद्ध होते आणि कीर्तन
ऐकण्याकरिता फार गर्दी होत असे.
दुसरी आठवण म्हणजे ७० घ्या दशकात, श्रावणमासाची ! यात ,
टोळ शास्त्री आणि मुळे शास्त्री यांची
भागवत कथा ,
अयाचित मंदिर आणि
सोनोबाची वाडी इथं होत असे. अर्थात
ही केवळ उदाहरणं झाली ,अशी अनेक
आयोजनं , विभिन्न ठिकाणी ,सुरूच
असत !
भक्ती आणि अध्यात्म यांची ही समृद्ध
परंपरा ,पुढे अशीच सुरू राहिली. मग
ती ,गोरक्षण ,जेल रोड इथली प्रवचनं
असोत किंवा दुर्गा मंदिर, प्रतापनगर
येथिल कीर्तन महोत्सव असो ! अशी
अनेक आयोजनं ,सतत ,नागपूरात
सुरूच असतात आणि ही इथली एक
विशिष्ट ओळख आहे,हे नक्की !