रहाटे काॅलनीपासून सुरू होणारा हा मार्ग थेट अंबाझरीपर्यत पोहचतो. माझे बालपण ,कलेकलेने वाढणारा जीवनक्रम सारे,सारे काही या मार्गाने पाहीले. हा मार्ग म्हणजे माझ्या आठवणींचा पेटारा.
मुळात नागपूरच मनात वसलेले .त्यात हा मार्ग जिव्हाळा आणि जिव्हाळा. बारा वर्षांनंतर नागपूरात आले व विंगकमांडर असलेल्या मुलीसोबत वायूसेना नगरात राहू लागले. परवा अचानक ती मला या मार्गावर घेऊन गेली. मी पहातच राहीले किती बदल. बदल नाही तर झगमगाट. 1960,65च्या काळात शांत असणारा हा मार्ग आज वाहनांनी वहात होता. नाही हा तो नाही ,मन मान्य करेना. काही तरी हरवल्यासारखे वाटले. घरी आल्यावर मात्र आठवणींना पूर आला
आज नावापुरते असणारे श्रद्धानंद पेठ त्यावेळी पाय रोवून उभे होते.
या मार्गाच्या दोन्ही बाजूला असणारी वस्ती म्हणजे श्रद्धानंद पेठ.
अभ्यंकर नगर ,बजाज नगर, ल क्ष्मीनगर ,माधव नगर हळूहळू विकसित होत गेले आणि श्रद्धानंद अनाथालयापुरते श्रद्धानंद पेठ राहीले. गोपाल नगर चौकापासून श्रद्धानंद पेठ चालू व्हायचे ते थेट रहाटे कॉलनी पर्यत. पुढे जेल रोड लागायचा की वळा बर्डीकडे.
गोपाल नगर चौकातून वळा अंबाझरीकडे. तिथून व्ही आर सीइ अर्थात व्ही एन आयटी ची हद्द सुरू व्हायची. तिथे काही कुडाची घरे होती. चहाची टपरी होती. पुढे ती उठवली.
उन्हाळ्याच्या सुटीत एके दिवशी आम्ही भावंडे निघालो अंबाझरीला.
माझा चुलत भाऊ आमचा गाईड.त्याने शाॉर्टकट शोधला.निघालो त्याच्यामागे घुसलो व्ही आर सीच्या हद्दीत.बांधकाम चालू होते.खड्डे खोदलेले होते.
विस्तिर्ण परिसर पण अनोळखी. थोडे चालत गेल्यावर आमचा गाईड मागे वळला व ओरडू लागला चला वळा तिथे खड्ड्यावर भूत बसलं आहे. बापरे !आम्ही सारे जीवाच्या आकांताने पळत निघालो.
त्याकाळी नं आम्हा मैत्रिणींच्या एका तरी भावाने भूत पाहीलेले असायचे नाहीतर चकवा तरी मागे लागलेला असायचा.आणि आम्ही
त्यांच्या ,वेड्या बहीणी भीती न दाखवता त्यांच्या कहाण्या ऐकायचो.
आमचा एक भाऊ" वह कौन थी "हा सिनेमा पाहून आल्यानंतर तोंडाने आवाज काढायचा व स्मशानाचे दार उघडायचा.
खरे सांगू या मार्गाने माझे बालपण जपले व वयाच्या या टप्प्यावर मला बहाल केले.
या मार्गाने पुढे गेले दीक्षाभूमी ओलांडली की माझी शाळा लागायची आजही तिथेच माता कचेरीसमोर. माता कचेरी शेजारी आय टी आय
आणि आमच्या शाळेशेजारी अंध विद्यालय.आमच्या शाळेचे नांव कुर्वेज् न्यू मॉडेल हायस्कूल, श्रद्धानंद पेठ,नागपूर.
महाराष्ट्र दिनाला अंध विद्यालयातील मुले आमच्या शाळेत यायची व गीत गायचे.महाराष्ट्र गीत "राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा,"
एकच जोष व त्या जोषात आम्हीही गायचो. बेसुरातही एकच सुर निर्माण व्हायचा ! त्या आठवणीने आजही मन भरून येते. सूर बेसूर या पलीकडचे बालपण व निरागसता ताल धरू लागते.
दीक्षा भूमी समोरील मार्गावर चिंचेची झाडे होती. मस्त चिंचा लागायच्या. आम्ही सर्व घोळक्याने चालत चालत शाळेत जायचो.
आमच्यापुढे चालणारी मुले चिंचेजवळ थांबायची व चिंचा पाडायची.
आम्ही मुली चिंचा वेचायचो व चिमणीच्या दाताने तोडून वाटणी करायचो. चिंच खात खात शाळेत पोहचायचो.
आमचे मुख्याधापक भालेराव सर होते. मुलींनी खेळले पाहीजेच हा त्यांचा आग्रह .ते मैदानावर हजर असायचे. आमच्या शाळेत मुलींसाठी
दोन खेळ होते ,लंगडी व खो खो .आमच्या शाळेत नववी ते अकरावीच्या मुलींना शाळेत साडी नेसणे अनिवार्य होते. घरी परकर पोलके घातले तरी शाळेत साडी नेसून यायचो.त्यावेळी युनिफार्म साडी होती. मरून रंगाचे काठ असलेली पांढरी साडी, पांढरे ब्लाऊज
नववी दहावीतील आम्ही सर्वजणी खोखो खेळायचो, पदर खोचून ,थोडी साडी खोचून बिनधास्त होऊन खेळायचो. कश्शी बाई मी खेळू ? हा प्रश्न कुणालाच कधी पडला नाही.खेळणे,खेळणे आणि खेळणे इतकेच आम्हाला माहीत होते.भालेराव सरांना किती आनंद व्हायचा ! त्यांचा चेहरा कौतूकमिश्रित आनंदाने फुलून जायचा.
तर असा हा दक्षिण अंबाझरी मार्ग, माझ्या माहेरचा मार्ग, माझे बाल्य जपणारा मार्ग, शांत, निवांत आणि सरळ.