नमस्कार मंडळी... काय मंडळी, सुटलं ना तोंडाला पाणी सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण म्हटला की पुजापाठ, व्रतवैकल्य, उपासतापास, सणवार आणि त्यानिमित्ताने वेगवेगळे नैवेद्य ही आलेच. नुकताच रक्षाबंधनाचा सण घराघरात संपन्न झाला. आणि आता अर्थातच वेध लागलेय ते श्रीकृष्ण जन्माष्टमीचे . येत्या शनिवारी 15 तारखेला गोकुळाष्टमी येतेय. कृष्णाष्टमी ला सुंठवडा/ पंजीरी असा नैवेद्य असतो पण त्यानंतर दुसर्या दिवशी दहीहांडी सुद्धा बर्याच ठिकाणी विशेषतः पुणे, मुंबई ईथे मोठ्या उत्साहात साजरी करतात. आपल्या नागपुरमध्ये असा दहीहांडीचा कार्यक्रम होतो का, ईथे पण अशी गोविंदापथकं आहेत का याची मला कल्पना नाही, करण मध्यंतरी बरीच वर्षे मी पुण्यात होते. कुणाला त्याविषयी काही माहिती असल्यास नक्की सांगा. दहीहांडीच्या दिवशी प्रसाद म्हणून खूप ठिकाणी गोपाळकाला केल्या जातो. नागपुरमध्ये ज्याला गोपाळकाला माहित नाही अशी व्यक्ती क्वचितच सापडेल. पुण्याला मी असताना ,गोपाळकाला कसा करतात, हे मला बरेचदा सांगावं लागायचं. तसं हल्ली फेसबुकमुळे सर्वच पदार्थांचा परिचय सर्वांना होतोच. तर, मला मात्र लहानपणापासूनच गोपाळकाला अतिशय आवडतो. आमचे रहाणे शंकरनगरला होते. घरामागच्या गल्लीतच काॅर्पोरेशन ची प्रायमरी शाळा होती. आम्ही त्याच शाळेत शिकलोय. शाळेच्या चारही बाजुला फार मोठे पटांगण होते. दरवर्षी समोरच्या भागात सार्वजनिक गणपती तसेच सार्वजनिक शारदोत्सव मोठ्या भक्तीभावाने, उत्साहाने संपन्न होत असे. दहा दिवस खूप छान करमणूकीचे भरपूर कार्यक्रम असायचे. पण खरी मजा यायची ती गणपती विसर्जनाच्या दिवशी. तशी द्विधा मनस्थिती असायची. बाप्पा गावाला जाणार असल्याने थोडं मन भावूक पण झालेलं असायचे . आणि आज आरतीनंतर गोपाळकाला असणार याचा आनंद ही असायचा. कधी कधी आरती होते आणि काल्याचा प्रसाद खायला मिळतो असे होत असे. खरं तर आमच्या घरी पण दहा दिवस गणपती बाप्पा असायचे.प्रसादाची रोजच रेलचेल असायची पण का य माहित, सार्वजनिक ठिकाणी जो प्रसाद तयार होतो ना ,त्याची चव च न्यारी. प्रसाद वाटण्याकरिता दोन तीन जण असायचे. प्रसाद घेणार्यांची पण झुंबड असायची. पण आम्ही लहानपणी फारच हावरट होतो. एकाजवळून प्रसाद घेतला की लगेचच खाऊन , घेतलाच नाही, या अवार्भावात परत दुसर्यासमोर हात पुढे करायचो, नंतर तो ही प्रसाद खाऊन तिसर्यासमोर हात पुढे करायचो.गंम्मत अशी की प्रसाद घेण्याकरिता ईतकी गर्दी असायची, की हात कोणाचे आणि चेहरि कोणाचा हे प्रसाद वाटणार्याला कळत नसे. आम्ही मात्र संधीचा पुरेपुर फायदा घेत असू. आता मात्र आठवलं की खूप हसू येतं. गोपाळकाला म्हणजे काय तर गोपाळ म्हणजे श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून त्यांच्या सवंगड्यांनी आणलेले सर्व खाद्यपदार्थ एकत्र करून , कालवून केलेला पदार्थ म्हणजे काला. अर्थात गोपाळकाला. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाची सांगता करताना काल्याचा पारसाद केल्या जातो. किर्तन, भजन, प्रवचन, भागवत असे विविध धार्मिक कार्यक्रम श्रावण महिन्यात आणि ईतरही सणांच्या निमित्ताने आयोजित केले जातात. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी रोज कार्यक्रमाला येणारे भाविक प्रसाद खाली हाताने घेऊ नये, तसेच आपलाही सहभाग असावा या उद्धेशाने येताना काही ना काही, जसे की, लाह्या साखर, दुध, दही फळं, पोहे असे स्वेच्छेने घेऊन येतात. कार्यक्रमाच्या शेवटी हे सर्व पदार्थ एका मोठ्या भांड्यात देवासमोरच एकत्र कालवले जातात. तोच हा गोपालकाला. भक्तीभावाने ,देवासाठी प्रसाद म्हणून केलेला असल्याने हा प्रसाद खाताना एक प्रासादिक आनंद मिळतो. मी सुद्धा दहीहांडी आणि गणपती बाप्प गावाला जायला निघाले की त्यांना शिदोरी देण्याकरिता दहीपोहे किंवा काला आवर्जून करते. आमच्याकडे सर्वांनाच हा प्रसाद आवडतो. तुमच्यापैकी बरेचजण करतही असतील. आपल्या नागपुरला गोपाळकाला हा सर्वानाच माहित असून तेव्हढाच आवडीचा ही आहे आणि शिवाय त्याचं महत्व ही सगळे जाणतातच. पण तरीही माझी काला करण्याची पदधथ थोडक्याय सांगते...ज्वारीच्या लाह्या आधि छान चाळून ,भरपूर पाण्यात घालून धुवून चाळणीत काढाव्या.त्यात ओलावा शोषण्यासाठी थोडे पातॢळ पोहे घालावे. भिजवलेली हरभरा डाळ, सोलून, चिरून काकडी घालावी. हिरव्या मिरच्या, दही, साखर, लिंबाचे गोड लोणचे, कैरीचे मोहरीचे लोणचे, मीठ, ओला नारळ, असल्यास डाळींबाचे दाणे असे सर्व छान एकत्र करावे. लाह्या तुम्ही धानाच्या पण घेऊ शकता. तर असा हा काला मन तर तृत करतोच पण तेव्हढाच पौष्टीक पण. एरव्ही सुद्धा नाश्त्याला आम्ही करतो. चला तर मग कोण कोण करणार आहे गोपाळकाला , पुढे बाप्पाचे पण आगमन होणार आहेच. बाप्पाला तर दहीपोहे प्रियच. तळटीप.... लिहिताना टायपिंग च्या चुका खूप आहेत. कृपया समजून घ्याल अशी आशा करते. .....* प्रसाद, * तृप्त, * पातळ पोहे * थोडक्यात * पद्धत ...वगैरे.