लाल पेटी व पोस्टमन
लाल पेटी निघणार असे कानावर आले.लाल पेटी निघणार म्हणजे पोस्टमन दादाही जाणार. मनात प्रश्न डोकावला. आमच्या पिढीत या दादाचे महत्त्व फार होते.सायकलवरुन येणारा पोस्टमन पाहिला की सगळ्यांच्या डोळ्यात उत्सुकता ! आमच्यावेळी कुठे होते फोन? सारे संपर्क पत्राद्वारे. पोस्टकार्ड,आंतरदेशी पत्र! मनाच्या आतल्या भावना आंतरदेशीय पत्रातून व्यक्त व्हायच्या.
त्याकाळी नवविवाहित कन्येचा सखा म्हणजे आंतरदेशीय पत्र. या पत्रात भावना व्यक्त करायच्या व पाठवायच्या माहेरी. आईच्या मनाची हुरहूर नष्ट व्हायची व मुलीचे मन आनंदी ! राखी पौर्णिमा आली की लिफाफे यायचे. राख्या नंतर लिफाफे आधी! राखी पौर्णिमेच्या कितीतरी आधीच लाल पेटीत लिफाफे पडायचे.
पोस्टकार्ड जेष्टामध्ये लोकप्रिय होते. माझे वडील कितीतरी पोस्टकार्ड घेऊन यायचे.आम्ही आमच्या संसारात रमलो. काही प्रसंगाने माहेरी जायचो त्यावेळी वडील म्हणायचे " ताई! एखादं पोस्टकार्ड टाकायचं , बरं वाटतं!"
आमच्या पिढीतील सर्वाच्या संसाराचे " गुलकंद "झाले ते या पत्रपेटीमुळे!
माहेरची आठवण निघाली म्हणून सांगते. माझे एक मामा कस्तुरचंद पार्क पोष्टात होते. बरीच वर्ष ते तिथे होते. कामानिमित्त मी त्या भागात गेले की त्यांना भेटायला जायचे. मामांना खूप आनंद व्हायचा सगळ्यांना सांगायचे ही माझी भाची खूप शिकली आहे मोठ्या काॅलेजात शिकवते.काॅलेजचे नांव विचारण्याच्या भानगडीत मामा कधीच पडले. त्यांच्या सर्व सोबत्यांची मी भाची होते. पटापट काम करत माझी विचारपूस करायचे. खरेतर मी उभ्याउभ्याच जायचे पण ते काही क्षण मायेने भारलेले असायचे.
गांधीनगर चे पोस्ट ऑफीस असेच आपलेसे करणारे! लहानसे, कमी गर्दीचे! तिथे एक बाई होत्या त्या बॅंक सांभाळायच्या. त्यांच्याकडून विश्वास मिळायचा.पटकन काम व्हायचे म्हणून जावेसे वाटायचे.पुढे हे ऑफीस शंकर नगर पोष्टात विलीन झाले. हे पोष्टऑफीस शंकर नगर चौकात आहे.
शंकर नगर पोष्टातून आमची पत्रे पोस्टमन घरी आणून द्यायचे.हे पोस्टमन दादा त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यत पत्र आणून देत होते. मी बरीच वर्ष नागपूर बाहेर होते.माझे घर बंद असायचे मी त्यांना सांगून ठेवले होते. त्यानुसार ते माझी सर्व पत्रे जवळ राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीजवळ द्यायचे. पुढे मोबाईल फोन आला. मैत्रीण फोन लावून द्यायची व ते मला सांगायचे" दिलंजी पत्र ".
लाल पेटी व पोस्टमन यांना आमच्या जीवनात जिव्हाळ्याचे स्थान होते. ते या पिढीतील मुलांना नाही उमगणार.पण हेही खरे पोस्टमन व आमच्यातील जिव्हाळा हा आमच्या नागपूरातच असू शकतो. कारण "ताई,बाई,भाऊ,दादा ही संबोधने आमच्या नागपूरात नांदतात. या संबोधनांमुळे कधीच कुणी अनोळखी नसतो.आणि नागपूरची ओळख पक्की करतो.