नागपूर चा उन्हाळा खाद्य पदार्थांची चंगळ

नागपूरच्या उन्हाळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दिवस उजाडतो तोच तापायला लागतं. हळूहळू उन्हं चढतील असे मुळीच नाही. हा सूर्य ही - ही आग! शैक्षणिक सत्र एव्हाना उन्हाळ्यात संपलेलं असतं त्यामुळे सर्व वयोगटातील विद्यार्थी घरी असतात. एवढा आग ओकणाऱ्या उन्हाळा, पण पुण्या- मुंबईची आते-मामे, चुलत भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपूरलाच येणार(धुडगूस घालायला ऐसपैस जागा)! दिवसाची सुरुवात अगदी चहानेच व्हायची आणि आजही होते. सहसा नाश्त्याची पद्धत नव्हती. सगळी जण सकाळी साडेनऊ-दहाला छान जेवून आपापल्या कामाला, पोळी भाजीचा डबा घेऊन जात. पण सुट्टी सुरू झाली की सगळं जुनं टाईम टेबल मोडून नवं टाईम टेबल सेट होणार.

साधारण आठ-साडेआठच्या सुमारास कंपल्सरी सातूचे पीठ. दुधात कालवलेलं किंवा पाण्यातही अगदी ताकात सुद्धा. त्यानुसार साखर/ गूळ, मीठ काय ते घालून ग्लासभर प्यायचं. थंड असतं प्रकृतीला! असं आजी सांगायची. दिवसभर सारखं येता-जाता थंड पाणी लागायचं. आणि खूप जण घरात असले म्हणजे दोन माठ असायचे. एक माठ संपला की दुसरा वापरायचा. कारण सगळ्यांना थंड पाणी मिळायलाच हवं.

सर्वात महत्त्वाची फळे या दिवसात म्हणजे आंबा, कलिंगड आणि खरबूज. सुरुवात मात्र कैरीने! बाजारात कैऱ्या यायला लागल्या की पहिल्यांदा भाव अगदी अवाक्याबाहेर असायचे. पाव किलो अर्धा किलो तरी आणायच्याच शकुनाच्या. मग भरपूर सतत रतीब! कैरीचे असंख्य प्रकार केले जायचे. अगदी बारीक फोडींचं तात्पुरतं लोणचं, कांदा- कैरीचा तक्कू, कैरी- खोबरे चटणी, कैरी-शेंगदाणे- गुळ चटणी आणि मेथांबा! याशिवाय आई कैरीचं 'बलक ' करायची. कैऱ्या उकडून गर काढायचा, त्यात मीठ,गुळ, लाल तिखट घालून कालवायचं आणि मेथी- हिंग- जिऱ्याची फोडणी घालायची. अगदी टॉक! लागायचं. तसंच पन्हं. यासाठी कैरी भाजुन /उकडून किंवा कच्ची वापरली जायची. आलेल्या पाहुण्याला गार आंबट- गोड पन्हं अगदी द्यायचंच. पुदिन्याची पाने, जिरा मसाला वगैरे चोचले मुळीच नसायचे साखर/ गूळ, मिठाची कणी, वेलदोडा-जायफळ पूड आणि फार झाले तर केशराची काडी. पन्ह्याचं कॉन्सन्ट्रेट अगदी तयारच असायचं. फ्रीज घरोघरी नव्हत. माठाखाली परात ठेवायची त्यात पाणी घालायचं आणि माठाला पातळ पांढरं ओलं कापड गुंडाळायचं. त्याची टोकं परातीत ठेवायची. छान गार राहायचं. नागपुरात अन्न फार लवकर आंबतं, त्यामुळे जेवण झाल्या- झाल्या उरलेलं अन्न ताबडतोब गारव्यात ठेवायचं. ते अन्न हमखास गार ठेवण्याची गृहिणींची जागा म्हणजे कुलरची वरची टाकी! ह्यात डबे ठेवले म्हणजे टिकणारच.

जेवणात आंब्याचा रस अगदी भरपूर असायचा दोन आंबे खाऊन "आम्ही रोज आंबे खातो" असं नसायचं! चांगली चार-पाच दिवसांची गॅप असायची कारण किती आंब्यांचा रस काढायचा याला गणतीच नसायची. चोखायचे आंबे शेकड्याने घ्यायचे पाचखडी नाही तर सहाखडी मोजायचे. म्हणजे एका वेळी पाच आंब्याचे माप न घेता प्रत्येक हातात तीन असे सहा आंबे. २0 वेळा मोजले की १०० च्या ऐवजी १२० आंबे मिळायचे. वर, जमलेल्या पोरांच्या हातावर एक-एक आंबा ठेवला जायचा. नागपूर ला फळांचा राजा बैगनपल्लीच! आम्हाला हापूसचं फार कौतुक नाहीच मुळी हा एकमेव आंबा सालीसकट खाता येतो. सोलून खायचे लाड नकोच! आंब्याचा रस काढायला मोठ्या बादल्यांमध्ये, आंबे पाण्यात गार करायला ठेवायचे. त्यांच्यातील उष्णता कमी करण्यासाठी. रस काढायला घरातील तरुण पुरुष मंडळी हौसेने बसत. बाकी पोरं तो सोहळा बघायला भोवती गोल करून बसणार. आंबे नीट माचवून, देठ नखाने तोडून, थेंबभर रस काढून टाकायचा, चिकाचा. मग बाकी आंब्याचा, मोठ्या पातेल्यात रस काढायचा. बैगनपलीच्या सालांनाही खूप रस असतो. आंब्याच्या सालीचं मागचं टोक उडवून, दोन्ही बाजूंनी नीट रस पिळून घ्यायचा. मग ती साले मुलांना मिळायची चोखायला.

तेव्हा बाजारात फारशा भाज्या नसायच्या. वांगी, कांदे, बटाटे! सुगरणी आलटून-पालटून याच भाज्यांचे पन्नास प्रकार करायच्या. पालेभाजी म्हणजे घोळ. कोरडी भाजी, कैरीच्या फोडी घालून पातळ भाजी, बेसन लावून ताकातलं आळण, घोळीच वरण, यापैकी काहीतरी नक्की व्हायचं.

जेवताना भक्कम आमरस आणि पोळ्या यांची पैज लागायची. मग इतर काही फारसं नसलं तरी चालेल घरातल्या बायकांना भरपूर पोळ्या कराव्या लागायच्या. कारण अगदी बारकं पोर सुद्धा तीन-चार पोळ्या सहज रिचवायचं. मोठ्यांचे तर बोलायलाच नको आंबा फोडी कापून खायचा असेल तर रात्री जेवण झाल्यावर!

आंब्याच्या रसाचे पोट फुटेस्तोवर जेवण झालं की छानसं पान लावून घ्यायचं. खरंतर पाटावरच डोळे मिटायला लागायचे. एव्हाना कुलर मध्ये पाणी भरून जय्यत तयारी असायची. प्रत्येक खोलीत कुलर ही चैन उशिरा आली. मोठा डेझर्ट कुलर सगळ्या घराला थंड ठेवायचा. त्याला वाळ्याच्या ताटया असायच्या. त्या दरवर्षी बदलल्या जायच्या. त्या वाळ्याचा मंद सुगंध घरभर दरवळायचा कुलर सुरू झाला म्हणजे सगळी लहान- थोर मंडळी, बैठकीच्या खोलीत गार झालेल्या जमिनीवर, जागा मिळेल तसे कोणत्याही अँगलने अंग टाकून द्यायची. अशी स्वर्गीय झोप लागायची!

साधारण चारच्या सुमारास, घंटी वाजवत कुल्फीवाला दारावर येणार. मोठ्या ढोबराला लाल कापड गुंडाळलेलं असे. लांबट कोनांमधे कुल्फीची फक्त काडी दिसायची. कुल्फीचे वेगवेगळे प्रकार नव्हते, फक्त आकारावरून किंमत असे. त्या ढोबऱ्यातून लांब कोन काढून कुल्फीवाला घुसळल्यासारखं करायचा. हाताच्या उष्णतेने कुल्फी कोनापासून सुटायची. मग ती आपल्या हातात! या कुल्फीला एक हलकीशी खारट चव पण लागायची. बर्फाचे तपमान कमी ठेवायला वरून भरपूर मीठ घातलेले असायचे त्याचे अंश! सरत्या दुपारी, ' बरफ का गोलावाला' गाडी घेऊन फिरायचा. बर्फ किसून छान पांढराशुभ्र भूरका करून तो काडीवर दाबून बसवायचा. त्या गोळ्यावर वेगवेगळ्या चवीचे आणि रंगाचे गोड पाणी घालायचे. खूप अप्रूप वाटायचं तो गोळ्या चोखून खायला! घरी मात्र बर्फाचा गोळा खायला फारशी परवानगी नसे. तो चोरून, नजर चुकवून खायचा. पण चोरी लगेच पकडली जायची, जीभ रंगलेली असायची ना! तो बर्फ नाल्यातल्या पाण्याचा बनवतात असा समज सर्वत्र पसरवल्या जायचा (काहीतरीच!). दुपारी दारावर चणे- फुटाणे वाला यायचा. खमंग, खारे शेंगदाण्याच्या पुड्या दरडोई घेतल्या जायच्या. भरपूर फुटाणे ,पोहे ,मुरमुरे ,दाणे अगदी पायल्या-पायल्याने घ्यायचे. संध्याकाळी उसाचा रस वाला दारावर यायचा. दुरून दिसला की धावत घरात जाऊन लाडीगोडी लावायची आणि मोठे स्टीलचे पातेलं घेऊन बाहेर धावायचं. अगदी हाका मारून, मारून बोलवायचं. जसं काही इतरांना रस दिल्यानंतर त्याच्या जवळचे ऊसच संपतील! तो आला की किती ग्लास हवे ते सांगायचं. बिना बरफवाला! त्याचं पातेलं बाजूला करून, त्यात पूर्वीचा रस नाही ना याची खात्री करून घ्यायची. रस गाळायचं फडकं झटकून स्वच्छ करायला लावायचं. मग रस काढणं सुरु. सूचना करायच्या... भैय्या अद्रक निंबू डालना भरपूर वगैरे... तयार रस त्याच्या ग्लासने मोजून तो आपल्या पातेल्यात ओतणार. खूप वरून रस ओतून जास्तीत जास्त फेस काढून रस द्यायचा. आणि मग मानभावीपणानं वरून थोडा उरलेला आपल्या पातेल्यात ओतायचा, जास्तीचा म्हणून! किती मधुर असायचा तो आले लिंबाच्या चवीचा रस निसर्गतः गारेगार. रात्री उशिरा ब्लू बेल आईस्क्रीम ची गाडी यायची. पांढरी गाडी, त्यावर निळे पट्टे आणि बेल्स जोडी. दिवसाची सांगता ह्या आईस्क्रीमने होणार. नेहमी नाही हं, क्वचितच! त्या फिक्क्या हिरव्या रंगाच्या पिस्ता आईस्क्रीम ची चव लाजवाब आजही जिभेवर रेंगाळते!

ज्या दिवशी आमरसाचे जेवण झालं नसेल तर हमखास दुपारी भूक लागणार. मग नागपूरचा राष्ट्रीय टाईमपास म्हणजे कच्चा चिवडा अगदी घमेलंभर करायचा. मुरमुरे, पोहे, शेंगदाणे, फुटाणे, बारीक चिरलेला भरपूर कांदा, कैरी, हिरव्या मिरच्या, असेल तर कोथिंबीर, सातूचे पीठ (ऑप्शनल), भरपूर कच्च शेंगदाणा तेल ( जवसाचे तेल ) मीठ, साखरेची चिमूट हे सर्व नीट कालवायचं आणि मधे ठेवायचं. प्लेट चमचे वगैरे काही नको. घमेल्याभोवती बसायचं आणि चक्क हाताने चिवड्याचा घास उचलायचा आणि उघड्या तोंडावर नेम धरून आत लोटायचा. काही मिनिटात ते घमेलं रिकामं व्हायचं!

बाजारात टरबूजं यायला लागली की चांगली गरगरीत, काळपट हिरव्या सालीची मोठ्ठी टरबूजं आणायची आणि मोठ्या बादलीत किंवा आमच्याकडे तर चक्क मागच्या टाक्यात पोहायला सोडून द्यायची. पुन्हा उष्णता कमी करायला टरबुजाची सालं काढून सुबक फोडी वगैरे लाड नव्हते. कलिंगडाच्या सालीसकट एकसारख्या मोठ्या फोडी करून हातात मिळायच्या. ती चंद्रकोर पांढरी पाठ लागेपर्यंत दातांनी कुरतडून खायची. तीच कथा खरबुजाची. खरबुजाच्या बिया चाळणीवर स्वच्छ धुऊन वाळवायच्या आणि वाळल्यावर गप्पा मारायला दातांनी टिचून आतला मगज खायचा. उन्हाळ्यात आईस्क्रीम पार्टी ही व्हायच्या. पाच लिटरचा आईस्क्रीम पॉट भाड्याने आणायचा. दूध घरी आटवून घ्यायचं. दुधाच्या सिलेंडर भोवती बाहेरुन बर्फ, मीठ घालून दांड्याने सिलेंडर गोल गोल फिरवीत राहायचं. सगळ्यांचा हातभार लागायचा. हात भरून यायचे अगदी! मग अंदाजाने आईस्क्रीम घट्ट झालं असं समजायचं. घरातील भरपूर वाट्या, चमचे गोळा झालेले असायचे. प्रत्येकाला मनसोक्त आईस्क्रीम मिळायचं .शेवटी, पातळ झालेलं आईस्क्रीमही मस्त लागायचं. परीक्षा झाल्यावर आमच्या गच्चीवर भेळ आणि आईस्क्रीम अशी जंगी प्रायव्हेट पार्टी असायची.

बाहेर आईस्क्रीम खाणं म्हणजे दिनशॉ, सदर तेव्हा ते शिष्ट आईस्क्रीम होतं! शंकर नगर ची शाखा बऱ्याच उशिरा सुरू झाली. मुंबईच्या पाहुण्यांना वाडीलालची कॉम्पिटिशन म्हणून एकदा तरी दिनशॉ मधे न्यायचंच आणि दिनशॉच कसं जास्त चांगलं आणि चविष्ट आहे ते दाखवून द्यायचं. ठस्सन दुसरं काय?

आणखीन एक पर्वणी म्हणजे बाहेर रस प्यायला जायचं. तेव्हा लक्ष्मी भवन चौकातील रसवंतीत आम्ही जात असू. उसाचा रस आणि अत्यंत चविष्ट भेळ! आता हे कॉम्बिनेशन कुठे दिसत नाही. या रसवंत्या सीजनल असायच्या पाणी मारून गार केलेली जमीन असायची. कापडाचा मांडव चारी बाजूनी आणि छत असायचं. खूप गार वाटायचं.

या सिझनमध्ये नेमकी लग्नसराई असते नागपूरला. डिसेंबरमध्ये लग्नाची फॅशन फार उशीर आली लग्न मार्च ते जूनच्या दरम्यान असायचं. मे मध्ये तर लग्नांना ऐन भर असायचा. लग्नात पंगत असायची. भरली वांगी किंवा रटरट शिजलेली वांगी बटाटा भाजी, जिलेबी, मसालेभात आणि मठ्ठा! मठ्ठा वाढणारा दूरवर दिसला की आपली वाटी रिकामी करून ठेवायची. अशा अनेक वाट्या मठ्ठा प्यायचा. लग्नातल्या त्या गारेगार पातळ ताकापुढे लस्सी झक मारेल! बैगनपल्ली चवीला उतरायला लागला की इतर आंबे बाजारात उतरू लागायचे. पण आंबा अगदी पाऊस पडेपर्यंत खायचा.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *