नागपूरचा उन्हाळा  एक सोहळा

नागपूरचा उन्हाळा एक सोहळा

नागपूरच्या उन्हाळ्याची चाहूल खरे तर आंब्याला मोहर आला की सूरू होते. मोहराचा मंद सुवास झाडाच्या जवळपास गेलं की प्रकर्षाने जाणवतो. खरेतर त्या गंधाने हुरहुर सुरू होते, परीक्षेच्या जाणिवेची! शाळा कॉलेजमध्ये syllabus संपवण्याची घाई सुरू होते. सबमिशन्सला ऊत येतो.

मग काही दिवसांनी सगळीकडून उगाचच सुसाट वारा सुरू होतो. त्या वाऱ्यात हिवाळ्याचा उरला- सुरला गारवा असतो. आजी म्हणते, महाशिवरात्रीचं वारं सुरू झालं हे वारं हळूहळू गारव्याला पार हुसकावून लावतं आणि उन्हाळा जाणवायला लागतो.

असेल तिथे पळस फुलायला लागतो. आंब्याच्या झाडावर बाळकैऱ्या दिसायला लागतात. मोगऱ्याचे झाड अचानक तरारून येते. त्याला पानोपानी नवे कोंब यायला लागतात आणि प्रत्येक कोंबातून आठ-दहा दिवसात चक्क पिटुकल्या कळ्यांचा गुच्छ डोकावू लागतो. तेवढ्यात मार्चच्या मध्यावर हमखास अवकाळी पाऊस डोकावतो. अगदी थोड्या वेळापुरता! पण तो गारांची फौजच घेऊन येतो हा मारा सहन न झाल्याने बऱ्याच कैऱ्यांचा अंगणात अक्षरशः सडा पडतो. जाणकार म्हणतात उरलेल्या कैऱ्यांवर ठरतो यंदा किती आंबा मिळणार ते! टीनावर पडणाऱ्या कैऱ्यांचा आवाज न बघता सांगतो की कैरी साधारण किती मोठी आणि पक्व झाली आहे ते. एकीकडे संध्याकाळी मोगऱ्याच्या शुभ्र टपोऱ्या कळ्या चढत्या संध्याकाळी फुलू लागतात आणि अंगणात सर्वत्र मोगऱ्याचा सुगंध भरून राहतो. झाडांना तर आता दोन वेळेला पाणी द्यावे लागते.

एप्रिल-मे तर अगदी उन्हाचा कहर अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडायचे, अन्यथा गडी-गुपचूप घरात राहायचे. नागपूरला एसी पेक्षा कुलरच जास्त दमदारपणे काम करतो पण पाण्याची टंचाई या एका महत्त्वाच्या कारणामुळे एसी चा प्रभाव व प्रसार जास्त झालाय. उन्हाळ्यात सारखं पाणी प्यावंसं वाटतं आणि घामानं जीव नकोसा होतो. आजकाल मात्र घामुळे प्रकरण फारसं ऐकू येत नाही. थंडाव्यासाठी अनेक उपाय केल्या जातात आतून-बाहेरून! परीक्षा संपल्या की खूप ऊन असलं तरी संध्याकाळी ' फिरायला' जाणे must दिवसभर दामटून ठेवल्यामुळे अगदी आठ- नऊ वाजेपर्यंतही मुले बाहेर खेळत असली तरी आई-वडील मुळीच ओरडत नाहीत.

लगोलाग कडूलिंबाला खूप कोवळी पाने आणि प्रत्येक फांदीच्या टोकावर बारीक पांढऱ्या फुलांचा फुलोरा येतो. गुढीपाडव्याला याचं फार कौतुक आणि महत्त्व! एप्रिल पासूनच गच्चीवर झोपण्याची धामधूम सुरू होते. संध्याकाळी गच्चीवर पाणी घालून उन्हाच्या वाफा काढून घ्यायच्या. ते पाणी तासभरातच सुकतं. अंधार पडला की सलग रांगेत गाद्या घालायच्या म्हणजे झोपायच्या वेळेपर्यंत छान गार होतात. रात्री आपली गादी सोडून भावा बहिणींच्या गादीवर लोळायचं आपली गादी गारच राहू द्यायची आई रात्री आवर्जून, उन्हे बाधू नयेत म्हणून हातापायाला कांद्याचा रस चोळते. गच्चीवर एक पाण्याने भरलेला माठ हवाच रात्री पाणी प्यायला. अगदी जून महिना सुरू होईपर्यंत हा आनंद घ्यायचा जर बारीक पावसाचा शिडकावा झाला तरी दामटून झोपून राहायचे. थेंब फारच टपोरे झाले तर गादीच्या फटाफट वळकट्या करून गच्चीवरच्या खोलीत एकावर एक रचून ठेवायच्या आणि घरात जागा मिळेल तसे चक्क सतरंजीवर झोपायचे. हेही दर उन्हाळ्यात होणारच. आता मात्र हे आठवणीतच राहील कारण स्वतंत्र घरांचे हळुहळू सदनिकेत रूपांतर होत असल्याने खाजगी गच्ची कालबाह्य होतेय.

मे च्या मध्यावर अचानक चिंचेच्या झाडावर खूप नवी कोवळी पालवी दिसायला लागते आणि त्यातून फुटायला लागतात पिवळ्या पाकळ्यांच्या फुलांचे अतिशय नाजूक घोस! प्रत्येक फुलात एक अगदी तिळाएवढी लहान पाकळी! या पाकळ्यांचा सोनेरी सडा झाडाखाली पडायला लागतो तशी पावसाची पक्की चाहूल लागते. आणि पुढची जबाबदारी पावसाळ्यावर सोपवून उन्हाळा खऱ्या अर्थाने विसावतो. दरम्यान पळस, बहावा आपले अस्तित्व अगदी ठळकपणे दाखवतात. बहावा तर फुलल्यावर चाळीस दिवसांनी नक्की पाऊस पडेल अशी हमी देतो.

असा हा उन्हाळा आंब्याच्या मोहराच्या चाहूलने सुरू होतो तो चिंचेच्या फुलांच्या घोसावर संपतो, आणि हे चक्र अव्याहत सुरू राहते

Share blog on whatsapp

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *