आमचे मधले घर आणि त्यावरचे दोन मजले, जुने मातीचे होते त्यामुळे उन्हाळ्यात वाळ्याच्या ताटयाआणि दोन्ही बाजूंनी कुलर लावला की एकदम थंडगार व्हायचे आणि हिवाळ्यात मात्र तितकेच उबदार असायचे. उन्हाळ्यात बाबा सुट्टी घ्यायचे त्यामुळे अर्थातच आम्हा मुलांना आरामाच्या वेळी येजा करायला मनाई असायची. आम्ही गुपचूप झोपण्यापेक्षा विहिरीच्या बाजूला, पेरूच्या झाडाखाली खेळायचो किंवा कोणाच्यातरी घरी पत्त्यांचा डाव आणि सोबत अस्सल नागपुरी कच्च्या चिवड्यावर ताव मारायचो.अहाहा! काय मज्जा! हिवाळ्यात मधल्या घराची विशेष गंमत म्हणजे ते खूप उबदार असायचे. नागपूरला तशी कोरडी आणि बोचरी थंडी असते. हिवाळ्यात आई तिथे कोळशाची शेगडी पेटवायची आणि त्यावर शिजवलेला पितळेच्या गंजातला भात व फोडणीचे वरण म्हणजे स्वर्गसुख. बरेचदा शेगडीभोवती आमची खाणे व वाचन अशी मेहफिल जमायची. कधी वाटाण्याच्या शेंगा, खेड्यावरची संत्री, उकडलेल्या तुरीच्या शेंगा असे खात खात वाचन चालायचे. दादा ने आम्हाला जीए कुळकर्णींच्या काजळमाया पुस्तकातील सर्व गोष्टी वाचून दाखवल्या होत्या. संस्कार हे असेच होतात त्यासाठी संस्कार वर्ग लावायची गरज नसते. वाड्यात खूप मोठे आंगण होते. तिथे आम्ही सगळेच शेजार पाजारचे मुलं मिळून खेळायचो. शेजाऱ्यांसाठी उन्हाळ्यात जास्तीचे पाहुणे आले तर खाटा टाकून झोपायची हक्काची जागा पण होती.
वाड्याचा तसा इतिहास मला माहित नाही. वाडा कधी बांधला होता, तिथे किती पिढ्यांनी वास्तव्य केलं याबद्दल काही कल्पना नाही. माझे वडील अतिशय कमी बोलायचे. आजोबा गेले तेव्हा ते फक्त आठच वर्षांचे होते. तेव्हा स्वतःचं शिक्षण, बहिणीचे लग्न, वाड्याचे संवर्धन या सगळ्या जबाबदाऱ्या खूप लहान वयात त्यांच्यावर पडल्या व त्यांनी त्या समर्थपणे पेलल्या. आई सांगायची की जयदेव नागपूरकर भोसल्यांचे सावकार होते. त्यांनी विहिरीच्या पलीकडील अर्धा वाडा दान दिला. तिथे म्हणे तळघरात सोन्याच्या मोहरांचा हंडा सापडला होता. त्यांनी जयदेवांना तो हंडा देऊ केला तर जयदेव म्हणाले की एकदा दान केला तर तुमचा. असो, काळानुरूप वैभव उरत नाही पण आठवणी मात्र असतात.
आमच्या वाड्याच्या जुन्या मातीच्या खोल्या होत्या, तिथल्या वरच्या माडीला लागून माळा होता. तिथे खूपदा आम्ही काही जुना खजिना लागतोय का म्हणून शोधायला जायचो. पण तिथे काहीच नसायचे. बाबांच्या माडीला लागून असलेल्या गच्चीत आम्ही उन्हाळ्यात गाद्या टाकून रात्री झोपायचो. नागपूरच्या कडक उन्हाळ्यात गच्ची फार गरम व्हायची मग संध्याकाळी विहिरीचे पाणी टाकून ती थंड करायची आणि रात्री मस्त चांदण्या बघत गप्पा मारत आम्ही बहिणी तिथे झोपायचो. सगळ्यात मजा म्हणजे संक्रांतीच्या वेळेला भावांसोबत मंजा घोटणे आणि गच्चीत पतंग उडवणे. अर्थात माझे काम फक्त चक्री धरण्याचेच असायचे. आमची जी जुनी मातीची माडी होती, तिला लागून जे नवीन बांधकाम केले होते, तिथल्या गच्चीला व खोल्यांना जोडणारे एक दार होते व एक खिडकी होती. त्या दारातूनच आम्ही माळ्यावरही जायचो. या माडीला लागून ज्या नवीन खोल्या होत्या तिथे ताई व मामा भाड्याने राहायचे. आमची परीक्षा असली की आम्ही मधल्या माडीत झोपायचो व ताई आम्हाला खिडकीतून पहाटे अभ्यासाला उठवायच्या. कालांतराने वरच्या मातीच्या माड्या पडायला आल्या होत्या. पाय ठेवला की जमीन दबायची. मला त्यात पण गंमत वाटायची.
वाड्यामधले सगळ्यात रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे माझे बाबा. त्यांना सगळे श्रीमंत म्हणायचे. काही मित्र पाटील म्हणायचे. आम्ही पाचही मुले त्यांच्या नजरेच्या धाकात असायचो. बाबा ऑफिस मधून येताना दरवाज्याची कडी वाजल्याबरोबर आम्ही पुस्तके हातात घेऊन बसायचो. मला वाटतं वडिलांशी मित्रत्वाच्या नात्यापेक्षा त्यांचा धाकच असावा. त्यांच्यामुळेच आज आम्ही पाचही भावंड उत्तम मार्गाला लागलो.
आमचे काही खूप मोठे एकत्र कुटुंब नव्हते. आम्ही पाच भावंड आणि काही भाड्याने राहणारी दोन तीन कुटुंबे. पण घर सदैव भरलेले वाटायचं. आईचा उत्साह आणि तिचा घरातील देखणा वावर यामुळे वाड्यात सदैव चैतन्य व आनंद असायचा. प्रत्येक सणवार, कुळाचार अतिशय निगुतीने आई पाळायची. दुसरे म्हणजे आमचे घर एकदम मोक्यावर असल्यामुळे सतत कुणाची ना कुणाची सदिच्छा भेट असायचीच .
वाड्यातील आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेरूचे झाड. लाल रंगाचा अतिशय स्वादिष्ट पेरू यायचा त्या झाडाला. बाकी पण अनेक झाडे होती सिताफळ, चमेली, बोरं . पूजेला लागणाऱ्या सगळ्या पत्र्या वाड्यातच मिळायच्या. बुधवार बाजार जवळ असल्यामुळे ताजी फळे, भाजी यांची काही कमतरता नसायची. आई खूपदा फोडणी टाकायची आणि भावाला सांबार (कोथिंबीर)आणायला बाजारात पाठवायची. शिवाय मुरमुरे फुटण्याच्या भट्टीवर नेहमीच ताजे गरम फुटाणे मिळायचे.
कल्याणेश्वर देऊळ आमच्या घराच्या बाजूलाच होते. सकाळी सहा वाजता रोज न चुकता तिथे 'घनश्याम सुंदरा श्रीधरा' ही भूपाळी लावायचे. पहाटे साडेपाचला लक्ष्मीनारायणाच्या देवळातून व्यंकटेश सुप्रभातम व विष्णुसहस्त्रनाम सुरू व्हायचे. परीक्षेत सकाळी उठल्यावर दुरून गान सरस्वती सुब्बलक्ष्मीचे मंत्रमुग्ध करणारे स्वर कानावर पडायचे.याहून प्रसन्न दिवसाची सुरुवात काय असू शकते? रात्री मात्र निरव शांततेत राजविलास टॉकीजच्या सिनेमातले गाणे व डायलॉग पूर्ण ऐकू यायचे.
आमच्या वाड्याच्या समोरच भूतांचे गणपतीचे देऊळ होते. रिद्धी सिद्धी सोबत गणपतीची अतिशय देखणी मूर्ती तिथे विराजमान होती. आमच्या महाल भागात रामनवमीला शोभायात्रा व पोळ्याच्या दिवशी मारबत निघायची. केळीबाग रोडवरच्या दुकानांमधून लोकांची बसण्याची व सरबताची सोय पण असायची. राम जन्माच्या दिवशी आईसोबत चप्पल न घालता धावत काळीकरांच्या मंदिरात बरोबर बारा वाजता पोहोचायचे आणि दर्शन व सुंठ साखरेचा प्रसाद घेऊन वापस यायचे. आमच्या आईला फार उत्साह असल्यामुळे ती आम्हाला भरपूर सांस्कृतिक कार्यक्रमांना घेऊन जायची. चिटणीस पार्क मध्ये होणारी भाषणे, कीर्तन, निलसिटी शाळेतील बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्याने ऐकतच आम्ही मोठे झालो व राष्ट्रसेवीका समितीच्या वर्गात जाणे यामुळे आमचे बालपण अतिशय समृद्ध झाले.
वाड्याबद्दल लिहायचे ठरवल्याबरोबर २३ वर्षांचा काळ झरकन डोळ्यासमोरून तरळून गेला. सगळ्यात जास्त आठवणी माझ्या मधल्या बहिणी सोबतच्या. ती माझ्याहून दोनच वर्षांनी मोठी असल्यामुळे आम्ही दोघी कुठेही एकत्रच जायचो. चतुर संगीत महाविद्यालयात गाण्याचे वर्ग,संघ बिल्डिंगच्या ग्राउंड वर मनमुराद खेळणे,जामदार मंदिरातील समितीचे वर्ग, बऱ्याच कॉमन मैत्रिणी आणि एकच शाळा यामुळे आमच्या दोघींच्या खूप आठवणी आहेत. वाड्यात अनेक मंगल कार्य घडलेत. माझ्या आठवणीतले म्हणजे, माझ्या दोन्ही भावांची मुंज आणि ताईचे साक्षगंध. सगळ्यात सुंदर आठवण म्हणजे आमच्या वाड्यात उन्हाळ्यात समितीचा कॅम्प भरला होता. समारोपाच्या दिवशी मावशी केळकर आल्या होत्या. कदाचित १९७६ चा काळ असेल. त्यांनी मला जवळ घेतले होते आणि आमच्या देवघरामध्ये 'श्रीराम प्रसन्न ' लिहिले होते ते वाचून त्या म्हणाल्या होत्या,' श्री सीताराम प्रसन्न लिहावे सीते शिवाय राम कधीच नव्हता'.
माझ्या लग्नानंतर आमचा वाडा विकला आणि तो पाडून तिथे नवीन अपार्टमेंटस़ झालेत. गेल्याच वर्षी महालमध्ये जाण्याचा योग आला. भुऱ्यांचे गणपतीचे देऊळ, भारत महिला शाळा अशा काही गोष्टी अजूनही तशाच आहेत. मात्र सगळे जुने वाडे पाडून नवीन इमारती झाल्यात. बुधवार बाजार पण डिमाॅलिश झाला. मुक्त ये जा असलेल्या संघ बिल्डिंगला कडक सुरक्षा आली. अर्थात जुन्या गोष्टी नष्ट होऊन नवीन येणारच. आपण बदलतो तसे आपले गाव, आपले शहरही रूप बदलत असते. बदल हा स्थायीभावच आहे. पण मन मात्र जुन्या गोष्टींना घट्ट चिकटून राहते. आमच्या वाड्यात मोकळी आणि प्रसन्न हवा,खूप सुरक्षितता आम्हाला मिळाली. आजही स्वप्नात आई-बाबांचे माझे घर म्हटले की वाडाच दिसतो.
जुन्या इमारती नष्ट होतच असतात
आणि नवीन बांधल्या जातात
मग ती वास्तू जुन्या व नवीन दोन्ही स्वप्नांना कुरवाळत दिमाखात उभी असते
आकाशाला गवसणी घालत.