मंडळी ! आर्थिक वर्ष २०२३-२४ हे आता येत्या ३१ मार्च ला संपेल आणि
१ एप्रिल पासून नवे आर्थिक वर्ष सुरू होईल. एप्रिल मधेच ९ तारखेला आहे
गुढीपाडवा,जेव्हा आपले नूतन वर्ष प्रारंभ होईल. पुढे १७ एप्रिल ला येईल
रामनवमी ! रामनवमी चा उल्लेख आला की माझे मन ,भूतकाळात शिरतं
आणि ७० च्या दशकातील नागपूर वास्तव आठवतं ! आमच्या तेथील
चिटणवीसपुरा मधे असलेल्या घरा समोरच दिघे यांचे राम मंदिर होते,
जिथं रामनवमी ला दुपारी १२ वाजता, रामजन्म मोठ्या उत्साहात साजरा होत
असे अन् दर्शन आणि प्रसाद याकरिता बरीच गर्दी रहात असे.तसं बघायला
गेलं तर ,नागपूरात , सारेच सण आणि उत्सव हे ,परंपरेचा निर्वाह करून ,फार
उत्साहात साजरे करण्याची प्रथा ही जुनीच ! काल ,असाच बसलो असताना ,काही आठवणी जाग्या झाल्या !
सुरूवात ,श्रावणमासापासून करता येईल. या महिन्यात , सारीकडे अगदी
भक्तिमय वातावरण बघायला मिळे . पाताळेश्र्वर मंदिर,महाल किंवा
कल्याणेश्वर मंदिर ,तेलंगखेडी इथं भाविकांची अलोट गर्दी पहायला मिळे.
प्रत्येक श्रावण सोमवार ,हा तर एकदम खास ! पुढे ,भाद्रपदात , गणेशोत्सव आणि
श्री महालक्ष्मी सणाची लगबग ! सारे वातावरण ,उत्साह आणि चैतन्य यांनी
भरलेले ! यावेळी ,नागपूरची व्यक्ती, देशात कुठेही असो , नागपूरला येणार
म्हणजे येणारच ! नंतरच्या अश्विन महिन्यात ,देवीच्या नवरात्र उत्सवाची
धूम ! या प्रसंगी ,आग्याराम देवीला होत असलेली भीड , आजही स्मरते.
पुढे येतो तो दसरा आणि या दिवशी रात्री ,उशीरा पर्यंत सोनं द्यायला येणारी
मंडळी मी पाहिली आहे ! नागपूरचे एक आगळे वैशिष्ट्य म्हणजे
रामनवमी ला ,पोद्दारेश्वर राम मंदिर येथून निघणारी ती भव्य शोभायात्रा !
खरोखरीच ,नागपूरची शान !यात ,जाणकारांनी , अधिक भर
टाकावी , हा प्रेमाचा आग्रह !