जुने नागपूर
मला वाटतं सकाळ पासून सुरुवात करावी...
जुन्या नागपूरची सकाळ मीलच्या भोंग्याने सुरू व्हायची। भल्या पहाटे पहिला भोंगा व्हायचा व आता सूर्योदय होणार हे कळायचे। या भोंग्याचा आवाज पार कामठी पर्यंत यायचा। भोंग्या बरोबर महाराजबागेतील डरकाळी सुद्धा कधीकधी ऐकू यायची। सोबत इंजिनाची शिट्टी व गाडीचा आवाज ऐकू यायचा। नागपूर भुसावळ ही रेल्वे व नागपूर गोंदिया रेल्वे पकडायला चाकरमान्यांची लगबग सुरू व्हायची। सायकलींचे ट्रिंग ट्रिंग सुरू व्हायचीl तेव्हा हेच प्रमुख साधन होते, गाड्या नव्हत्याच जवळपास l
तर एकूण भोंग्याला नागपूरकरांच्या आयुष्यात खूप महत्व होते। विविध भारतीवरील कार्यक्रम, बातम्या , इन्स्ट्रुमेंटल music व जयमाला कार्यक्रम भोंग्याच्या आवाजावरून कळायचे। गंमत म्हणजे उन्हाळ्यात बाहेर झोपले तर भोंग्यातून निघालेली राख अंथरुणावर पडायची व कपडे काळे व्हायचे।
भोंग्या सारखीच नामशेष झालेली अजून एक गोष्ट म्हणजे वाडेl जुने नागपूर हे मध्यमवर्गीयांचे शहर होते व वाडा संस्कृती होती। जिवाभावाचे संबंध होतेlशेजारधर्म पाळणारे लोक होते। कुठल्याही घरी कोणताही कार्यक्रम असो तो सार्वजनिक व्हायचा।अगदी जन्मापासून शेवटपर्यंत। वाड्यात कोणी दादा, मामा, काका, काकू, मावशी व आजीआजोबा असे प्रेमाने जडलेले नातेवाईक असत। कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायचं आणि एकोप्याने अडचणी सोडवायच्या हे बाळकडू तिथेच मिळत असे l नातेवाईकांना समजत नसे की कार्य एका घरचे आहे की सामूहिक।प्रत्येक वाड्यात एक नारायण सुद्धा असायचाच। जवळच गुजरी रहायची। तेव्हा प्रायव्हेट स्पेस नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती त्यामुळे सर्वांचे लक्ष असे l आपोआप चोऱ्या कधी व्हायच्या नाहीत।चुकून चोर आलाच व पकडल्या गेला तर त्याचे काही खरे नव्हते।
हर चीज हर माल चा ठेका वाड्यात व वस्तीत यायचा।
पूर्वी पासून नागपूरचे दोन प्रमुख भाग आहेत, पुलाच्या अलीकडचे आणि पुलाच्या पलीकडचे नागपूर l आता पूर्व आणि पश्चिम असा उल्लेख होतो l पूर्व नागपूर राजकीय घडामोडी, चळवळी ह्यांचं उगम आहे l तिथे कुठल्याही राजकीय घटनेचे पडसाद आधी उमटतात आणि तिथली एकूण हवा बघून पश्चिम नागपूर जागे होतें l
इथे विशेषतः महाल भागा चा उल्लेख आवर्जून करावाच लागेल l तिथे खूप खेळी मेळीचे वातावरण असायचेl
आजही बऱ्या पैकी परंपरा आणि संस्कृती महालात जपलेली दिसून येते l सर्व सण अजूनही येथे गुण्यागोविंदाने साजरे होतात।
बर्डी चे महत्व त्याकाळी सुद्धा व्यापार पेठ असेच होते।
सिव्हील लाईन मध्ये बहुतेक शासकीय कार्यालये व कॉलेज होती।
त्यामानाने धंतोली, रामदासपेठ व धरमपेठ मध्ये बंगलेवजा संस्कृती होती। मोठे आवार, झाडे व बंगल्या भोवताल मोकळी जागा अशी रचना साधारण दिसायची l
सदर भाग परका वाटायचा। फक्त दिनशा आईसक्रीम खायला जायचो।लक्ष्मीनगर,बजाजनगर व अभ्यंकर नगर मध्ये वस्ती खूप तुरळक होती। आता विश्वास बसत नाहीl तेव्हा शहराच्या प्रत्येक विभागांचे असे वेगवेगळे व्यक्तिमत्व होतेl आता सगळे सारखेच दिसतातl
सहज आठवलेली व आता नामशेष झालेली अजून एक गंमत म्हणजे जादूटोणा आणि इतर अंधविश्वासl
त्या काळी भुता खेतावर व जादूटोण्यावर बऱ्याच लोकांचा विश्वास असायचाl करणी हा शब्द तर आजच्या पिढीला माहितही नसेलl
आजही आठवते की शाळेत जातांना किंवा कोणत्या कामास जातांना रस्त्यात मांजर आडवे गेले तर आपण सात पावले मागे जायचो व जोपर्यंत कोणी पुढे जात नाही तोपर्यंत आपण पुढे जात नव्हतो।
असाच प्रकार रस्त्यावर सात पिवळ्या गाठी बाबत नेहमीच पाहण्यात यायचा। या गाठी मंतरलेल्या असायच्या असे मोठ्यांकडून ऐकले होते व त्या ओलांडू नका अशी सक्त ताकीद प्रत्येकाच्या घरून असायचीच। ओलांडल्या तर शरीरावर सात गाठी येतात असे पण ऐकले होते। मी अश्या गाठी काडीने रस्त्याच्या दूर करायचो व नालीत टाकायचो। भोवतालची आबालवृद्ध मात्र कौतुकाने पहायचे।
लिंबाला सुई टोचून ठेवणे हा प्रकार जादूटोण्याचा होता।
मी चंद्रपूरला असताना माझ्या घरासमोर पत्रावळीवर भात,रुईचे पान,हळदकुंकू व दिवा कोणीतरी ठेवायचे।मुली लहान होत्या त्यामुळे काळजी वाटायची l कोण ठेवते ते कळत नव्हते।सारखी लपून पाळत ठेवली असतांना चार घरा पलीकडली म्हातारी आजी ठेवते असे दिसले।बरे,म्हातारी रोज माझ्याशी गोड बोलायची। मी पण तिला कल्पना दिली नाही की तूच ठेवते हे मला माहित आहेl मी संधीची वाट पहात होतो व ती मिळालीl बरोब्बर थोडा अंधार झाल्यावर आजीबाई चुपचाप आल्याच। मीपण तयार होतो। ती म्हातारी ते ठेऊन गेल्यावर मी दिवा विझू दिला आणि पत्रावळ शांत पणें उचलली l सोबत एक आगपेटी व छोटा मेणबत्तीचा तुकडा घेतलाl सिगरेट ओढायचे निमित्त करून घरून निघालोl म्हाताऱ्या बाईच्या घरासमोर पत्रावळ ठेवली, मेणबत्ती खोचली व पेटवलीl पुढे सिगारेट घेण्यास पान ठेल्यावर चाललो गेलो। सकाळी म्हातारीने खूप बोंबाबोंग केली। आजूबाजूचे लोक जमा झाले त्यात अर्थात मी पण होतो। तिने खूप आकांडतांडव केला l हे काम करणाऱ्यांच्या सर्व पिढ्यांचा तिने उद्धार केला। पण त्या नंतर असा प्रकार पुन्हा घडला नाही l असे अनेक मजेदार किस्से आता घडत नाहीतl
त्याकाळचे नागपूर म्हणजे आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास "happening" होते
आणि त्यामुळे लिहावे तेवढे थोडेच पडेलl